नाशिकच्या दिंडोरीमधून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकरी लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे सर्व आंदोलक शेतकरी वाशिंदहून नाशिकच्या दिशेने परत जातील, अशी माहिती अजित नवले यांनी दिली आहे.
कांद्याला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफीशी संबंधित मागण्यांसाठी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
आपल्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च पायी मोर्चा काढण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं होतं.
मंगळवारी (14 मार्च) रोजी शेतकऱ्यांच्या मोर्चाला नाशिकहून सुरुवात झाली. मोर्चा शहापूरजवळ असताना शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला गेलं होतं.
या मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या सगळ्याच मागण्या मान्य झाल्याने आयोजकांनी मोर्चा थांबवण्याची घोषणा केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा हे पक्ष आणि संघटना, तर माजी आमदार जे. पी. गावित, अजित नवले, अशोक ढवळे आणि डॉ. डी. एल. कराड हे नेते या मोर्चाचं नेतृत्व करत होते.
त्याशिवाय, विविध राजकीय पक्ष आणि राज्यभरातील शेतकरी संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच मोर्चा मार्गावरील गावांमधूनही लाँग मार्चला गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.
शेतकरी लाँग मार्चची सुरुवात नाशिकच्या दिंडोरीमधून रविवारी (12 मार्च) दुपारी दोन वाजता झाली होती.
सुरुवातीला हा मोर्चा 23 मार्चपर्यंत विधानसभेवर पोहोचवण्याचं नियोजन पूर्वी करण्यात आलं होतं.
मात्र, नंतर 20 मार्चपर्यंत मोर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेवर धडकण्याचं नियोजन आयोजकांनी केलं.
मोर्चा नाशिकमध्येच थांबविण्याच्या दृष्टीने गावित यांच्याशी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रयत्न केले.
परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळात मागण्यांबाबत निर्णय घेतल्याशिवाय मोर्चा थांबणार नसल्याचा निर्धार गावित यांनी व्यक्त केला. त्यामुळे मोर्चा नाशिकमध्ये थांबवण्याचे सरकारचे प्रश्न अयशस्वी ठरले.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि किसान सभेचे शिष्टमंडळ यांच्यात तब्बल 4 तास झालेली बैठक 'लाँग मार्च'ला थांबवू शकली नाही.
अखेर, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत 12 सदस्यीय शिष्टमंडळासोबत मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सर्व मागण्या मान्य झाल्याने अखेर, शेतकरी लाँग मार्च थांबवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
Published By -Smita Joshi