बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे नेहमी चर्चेत असतात. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत दाखल होत असून त्यांचा मीरा-रोड येथे सुमारे सात एकर मैदानात शनिवारी आणि रविवारी प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय जनता पक्षातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मात्र, या कार्यक्रमाबाबत शहरात प्रचंड विरोध होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांकडे तक्रार केली आहे, तर मनसेनेही हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे.
या कार्यक्रमाबाबत राज्यभरात निदर्शने होत आहेत. मीरा-भाईंदरमध्येही आंदोलन सुरू झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे, तर मीरा-भाईंदर मनसे नेते संदीप राणे यांनीही कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा कार्यक्रम थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
18 आणि 19 मार्च रोजी मीरा रोड येथे त्यांचा दरबार भरणार आहे. मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड भाईंदर येथील एसके स्टोन चौकीजवळील सेंट्रल पार्क मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे.
बागेश्वर धाम सरकारच्या दरबारात सायंकाळी 5 ते 9 या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. बागेश्वर धाम येथे 50 हजार ते 1 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.