अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपाच्या तिकीटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. मात्र माधुरीच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचा दावा केला आहे. हे वृत्त खोटं आणि निराधार असल्याचं प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातमीमुळे पुण्यात आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आलं होतं. मात्र माधुरीच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह भाजपा संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितची तिच्या घऱी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चाही चांगलीच रंगली होती. दरम्यान माधुरीने मात्र स्वत: यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.