बंजारा समाजाच्या पोहरादेवी देवस्थान येथे समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी संजय राठोड नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच आता पोहरादेवी संस्थानसाठी ५९३ कोटी रुपये विकासनिधी दिला आहे," अशी घोषणा केली.
ते पुढे म्हणाले की, "वसंतराव नाईक महामंडळाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. ५० कोटी रुपये बंजारा महामंडळाला देणार आहोत. तसेच, नवी मुंबई येथे बंजारा भवन उभा करणार आहोत." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शंभर कोटी रुपये दिले होते. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत छदामही दिले गेले नाही. आमच्या सरकारने ५९३ कोटी रुपयांचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे," असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर, त्यांनी संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणदेखील केले. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor