मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथे त्यांच्या गावी गेले आहेत. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना आगामी निवडणुका कोणाच्या नेतृत्त्वात लढवल्या जाणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच आगामी निवडणुकांचा निर्णय आमची संसदीय समिती घेईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे, याकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर ते म्हणाले, चिंता करु नका. गेले सात आठ महिने आम्ही जे काम केले आहे. त्यामुळे काहीजणांच्या पोटात दुखत आहे. अजून आम्ही दिड वर्षे काम करणार आहोत. महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.
अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्यांना घरी बसवलं ना. त्यांच्याकडे आता काहीच काम नाही. त्यामुळे ते आरोप करत आहेत. टीका करत आहेत. आम्ही टीकेला टीकेतून उत्तर देणार नाही. कामातून आम्ही उत्तर देणार आहोत. मी कधीही सुट्टी घेतली नाही. आता मी डबल ड्युटी करतो आहे. महाबळेश्वरमध्ये प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. य़ेथील रस्त्यांची पाहाणी केली. पर्यटकांच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. मी काम करतो आहे आणि करत राहणार आहे, असे मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक तीन दिवसांची सुट्टी घेतली. ते साताऱ्याला गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी तीन दिवस सुट्टी घेतल्याने राजकीय वातावरण तापले. रिफायनरी प्रकल्पामुळे नाराज होऊन मुख्यमंत्री शिंदे साताऱ्याला निघून गेल्याची चर्चा होती. तसेच अनेक तर्कविर्तक करण्यात आले. अखेर मंगळवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधून मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वच शक्यतांना पूर्णविराम दिला. आगामी निवडणुका कोणाच्या नेतृत्त्वात लढवणार यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
Edited By- Ratnadeep Ranshoor