"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीचा दौरा करत आहेत. मात्र मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीत जात आहेत. ते महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत जात नाहीत",, असा हल्लाबोल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
ते पुण्यातील तळेगावमधील जनआक्रोश आंदोलनात बोलत होते. फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगावात होणार होता. मात्र तो प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज तळेगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
"महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरूणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेला. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत".
"महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात गेले मात्र त्यातील एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. त्यात फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील महाराष्ट्राबाहेर गेले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मोठा उपलब्ध होणार होता. परंतु, या सरकारने तरुणांच्या तोंडातील घास हिरावून घेतला", अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.