शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे नाशिक दौर्यावर असताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवडणुकानंतर शिक्षक भरती करण्याचे आश्वसन दिले. सदरचे वक्तव्य आचारसंहिता भंग करणारे असल्याची तक्रार पदवीधरचे उमेदवार भाकपचे राजू देसले यांनी केली होती. या प्रकरणात प्रशासनाने तावडे यांना क्लिनचीट देत, देसले यांना पुरावा सादर करण्याचे आदेश देण्यात आला आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघासाठी भाजपचे उमेदवार डॉ. प्रशात पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी विनोद तावडे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी तावडे यांनी शाळांच्या संस्थाचालकांची भेट घेत प्रलंबित शिक्षक भरतीबाबत निवडणूक आचारसंहितेनंतर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. त्या संदर्भात पदवीधर मतदारसंघातील भाकपचे उमेदवार कॉ. राजू देसले यांनी आचारसंहिता भंगाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्ह्यात पदवीधर, जिल्हापरिषद, महापालिका आणि पंचायत समितीची निवडणूक आचारसंहिता सुरू असताना शिक्षक मतदारांना आमीष दाखविण्यासाठी तावडे यांनी सदरचे आश्वासन देऊन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे देसले यांचे म्हणणे होते. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी नाशिकच्या प्रांत अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता, तावडे यांच्या वक्तव्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तक्रारदाराने सबळ पुरावा दिला नसल्याचे सांगत, तक्रारदाराने सबळ पुरावा दाखल करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे तक्रारदाराला पुन्हा पुरावे जमा करावे लागणार आहेत.