Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल
, बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (22:06 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास वाढला आहे. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन ते तीन दिवस ते रुग्णालयात उपचार घेणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्याबाबतची माहिती दिली आहे. गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.
 
मुख्यमंत्री म्हणतात 
माझ्या बंधू, भगिनींनो आणि मातांनो
जय महाराष्ट्र!
 
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावे या दृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.
 
यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.
 
आपला नम्र
 
उद्धव बाळासाहेब ठाकरे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटी संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही