Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आव्हाड यांचा पूर्वेतिहास ध्यानी घेता त्यांना मोकळे सोडणे समाजास घातक केतकी चितळे

ketki chitale
, शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (07:49 IST)
आमदार जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच अटक करण्यात आली. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेनेही उडी घेतली आहे. केतकी चितळेने तिच्या वकीलामार्फत एक नोटीस वर्तक नगर पोलिसांना पाठवली आहे. त्यात तिने जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी कलमे लावावी, अशी मागणी केली आहे.
 
अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या वकिलांमार्फत वर्तकनगर पोलिसांकडे एक नोटीस दिली आहे. त्यात तिने जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर पोलिसांकडे दोन मागण्या केल्या आहेत. त्यांच्यावर लावलेली कलमे पुरेशी नसून त्यात वाढ करावी, अशी मागणी प्रामुख्याने तिने केली आहे.
केतकी चितळेच्या पत्रात नेमकं काय?
 
ठाणे येथील चित्रपटगृहावरील हल्लाप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. असे असले तरी पोलिसांनी भारतीय दंडसंहितेची कलमे १२० ब आणि ३५४ लावलेली नाहीत. आबालवृद्ध मराठीभाषक मध्यमवर्गीय स्त्रीपुरुष चित्रपटगृहात जमले असताना केलेल्या निर्घृण हल्ल्यामुळे घबराट पसरून चेंगराचेंगरी झाली असती तर काहींना जीव गमवावा लागला असता याची जाणीव असूनही केलेला हा हल्ला पूर्वनियोजित होता. त्यामुळे कट कारस्थान करून हा हल्ला झाल्याने कलम १२० ब लागू आहे. तसेच तक्रारदाराच्या पत्नीवर हात टाकण्याचा प्रयत्न झाल्याने विनयभंगासंबंधीचे कलम ३५४ देखील लागू आहे
 
आव्हाडांची सुटका झाल्यास सध्या फरार असलेले साथीदार इतर चित्रपटगृहांवरही असे हल्ले करण्याचे भय आहे. आव्हाडांच्या निवडणूक शपथपत्रानुसार असे कित्येक गुन्हे त्यांच्यावर ठाणे जिल्ह्यातच अगोदरच नोंद झाले आहेत. यापूर्वीच त्यांना तडीपार केले असते तर आताचा गुन्हा टळला असता.
 
 या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून जास्तीत जास्त दिवसांची कोठडी घेणे तसेच जामिनाला विरोध करणे आवश्यक आहे. आव्हाड यांचा पूर्वेतिहास ध्यानी घेता त्यांना मोकळे सोडणे समाजास घातक आहे, असे न करता आव्हाडांना साह्य करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यास उच्च न्यायालयाकडे दाद मागावी लागेल असा इशारा देणारी नोटीस केतकी चितळे यांच्या वतीने कायदेशीर सल्लागार यांच्याकडून वर्तक नगर पोलिसात बजावण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’प्रवेश केला