खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांना जीवे मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. श्रीकांत शिंदे यांनी एका गुंडाला मला जीवे मारण्याची सुपारी दिली असून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी देखील भीती राऊतांनी व्यक्त केली आहे.
याबातचे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीट पोस्टमध्ये ३ वेगवेगळे पत्र टाकले आहेत. एक पत्र त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना, एक ठाणे पोलीस आयुक्तांना तर एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. त्यात संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांची सुपारी दिल्याचे थेट आरोप केले आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट केलेले ३ पत्र
पहिले पत्र
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळवले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसवलेल्या गुंड टोळक्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळवले आहे. आज माझ्याकडे पक्की माहिती आली आहे. ठाण्यात एक गुंड राज ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एकच जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे. असे पत्र मुंबईच्या पोलीस आयुक्तांना संजय राऊत यांनी लिहिले आहे.
दुसरे पत्र
गेली ४० वर्ष मी सार्वजनिक जीवनात आहे. राजकारणाबरोबर पत्रकारिता करत आहे. मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या येत असतात आणि तसे प्रयत्न देखील झाले आहेत. मी आज आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की माझ्यावर हल्ला करण्याचा कट ठाण्यात शिजल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय रित्या समजली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असून मला समजलेली ही माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे. अशी पत्राद्वारे माहिती खासदार संजय राऊत यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिली आहे.
तिसरे पत्र
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा हटवण्यात आली. मी त्याबद्दल माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे आणि गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो ठाण्यातील एका कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे. असे पत्र खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले आहे.
संजय राऊत यांच्या या पत्रामुळे आता राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor