मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही प्रतिष्ठेची आणि मानाची खुर्ची असते. त्यामुळे त्यावर बसण्याचा मोह सर्वच राजकारण्यांना होत असतो. असाच मोह आता खासदार श्रीकांत शिंदे यांनाही झाला असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी एक फोटो ट्विटरवर अपलोड केला असून खासदार श्रीकांत शिंदे त्यांचे मुख्यमंत्री वडील एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत.
खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?” असा प्रश्न रविकांत वरपे यांनी विचारला आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दुसऱ्या जबाबदार व्यक्तीने बसणं योग्य नसल्याचे आरोप श्रीकांत शिंदेंवर केला जातोय. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
श्रीकांत शिंदे ज्या खुर्चीवर बसले आहेत तिथे मागेच महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा फलक लागलेला दिसत आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, हा फोटो मंत्रालयातील कार्यालयातील नसून एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील निवासस्थान असलेल्या कार्यालयातील असल्याचंही स्पष्ट झालं आहे.