शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये यापुढे कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन असोसिएशनने पालकमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिले आहे. यापुढे कोरोना रुग्णांना दाखल करुन घेणार नसल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्ग आता बऱ्यापैकी घटला आहे. सरकारी आणि महापालिका हॉस्पिटलमधील अनेक बेडही रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना सरकारी आणि मनपा हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणे शक्य आहे. सर्व खासगी हॉस्पिटलने आजवर सर्व सरकारी नियमांचे पालन करीत आरोग्यसेवा केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सलग सेवा दिल्याने आमचे सर्व डॉक्टर, कर्मचारी व आरोग्यसेवक थकले आहेत. त्यांना थोड्या विश्रांतीची गरज आहे. सध्या साथ आटोक्यात असल्याने खासगी हॉस्पिटलमधील कोविड सेवा आम्ही बंद करीत आहोत. यापुढील काळात पुन्हा गरज भासली तर आम्ही सेवा देऊ, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनावर अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सचिन देवरे, डॉ. राज नगरकर, डॉ. समीर अहिरे आदींची स्वाक्षरी आहे.