Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑनलाइन दीक्षा देणारे वर्ध्यातील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ

ऑनलाइन दीक्षा देणारे वर्ध्यातील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ
, बुधवार, 29 एप्रिल 2020 (08:39 IST)
कुलपती दत्ता मेघे यांनी दिली विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेची दीक्षा
750 विद्यार्थी झाले सहभागी
कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. तसेच सार्वत्रिक कार्यक्रम आयोजित करण्यावर सुद्धा बंदी आहे. अशा परिस्थितीत डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य उपयोग करीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन दीक्षा देणारे वर्ध्यातील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पदवी व पदव्युत्तर परीक्षांच्या निकालानंतर १८० दिवसात दीक्षान्त समारंभ घेऊन पदवीदान करणे अनिवार्य असते. सध्या कोविड 19 चा संसर्ग थांबविण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आयुर्विज्ञान संस्थेने केंद्र व राज्य शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन करीत आपापल्या ठिकाणी उपस्थित राहून झूम अॅपच्या मदतीने 11वा आगळावेगळा दीक्षान्त समारोह घेतला.
 
यावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलपती  दत्ता मेघे यांनी स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन दीक्षा देत त्यांचे अभिनंदन केले. या समारोहात विविध स्थानावरून अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती व मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, डॉ.सतीश देवपुजारी, अशोक चांडक, डॉ.नीलम मिश्रा, डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. सुनीता वाघ, डॉ. तृप्ती वहाने, राघव मेघे, प्रकुलगुरू डॉ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, डॉ. आदर्शलता सिंग, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.सुधींद्र बालिगा, आयुर्वेद शाखेच्या अधिष्ठाता डॉ.प्रीती देसाई, भौतिकोपचार शाखेचे डॉ.इर्शाद कुरेशी, नर्सिंग शाखेच्या अधिष्ठाता डॉ.सीमा सिंग, डॉ.वैशाली ताकसांडे, परावैद्यकीय शाखेच्या डॉ.अलका रावेकर, डॉ.गौरव मिश्रा आदींनी ऑनलाइन सहभागी होत आपली भूमिका बजावली.
 
यावेळी डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना ‘कोविड योद्धा’ बनून देशवासियांना आरोग्य सेवा देण्याचे आवाहन करीत उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
 
या समारोहात वैद्यकीय शाखेतील ३३६, दंतविज्ञान शाखेतील १६५, आयुर्वेद शाखेतील ९८, नर्सिंग शाखेतील १६३, पॅरावैद्यकीय शाखेतील १९, भौतिकोपचार शाखेतील ८ आणि आंतरसंलग्न विषयातील २ अशा एकूण ७९१ विद्यार्थ्यांना कुलपती दत्ता मेघे यांनी
आरोग्यसेवेची दीक्षा दिली.
 
सद्यस्थितीत समारंभ आयोजित करणे शक्य नसल्याने आणि युजीसीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये याचीही दक्षता घेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा प्रतीकात्मक दीक्षान्त समारंभ घेण्यात आला.
 
या प्रकारचा देशातील हा कदाचित पहिलाच दीक्षान्त समारोह असावा. मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पदवीदान केले जाईल तसेच सुवर्ण, रौप्य आणि चान्सलर ॲवॉर्ड प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानितही केले जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.राजीव बोरले यांनी दिली.
 
या आगळ्यावेगळ्या दीक्षान्त समारोहात देशविदेशातून सुमारे ७५० विद्यार्थी झूम, यु ट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून सहभागी  झाले होते. या समारोहाचे संचालन डॉ. समर शुक्ल यांनी केले. नेहमीप्रमाणेच या ऑनलाईन समारोहाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ