माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या एकल पीठाने ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला. देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती.
देशमुख यांना ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयच्या खटल्यात ते अजूनही कोठडीत आहेत. न्यायालयाने देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी वसुली प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन दिला आहे. परंतु सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आताही तुरूंगात राहावे लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आठवड्याभरात सुनावणी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी आपल्या बाजू न्यायालयासमोर मांडल्या. अनिल देशमुख यांचे वय 72 वर्षे आहे, त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा असे अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी न्यायालयामोर सांगितले.
Edited By - Ratandeep Ranshoor