मुंबई: “इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कचरत कशी नाही. महोदय, तुमचं सरकार सर्वात कलंकित सरकार आहे. म्हणून तर प्रकाश मेहता यांना घरी जावं लागलं नाही का,” अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आमचं सरकार पहिलं सरकार आहे की ज्यावर कोणताच दाग नाही असं विधान केलं होतं. त्यावर सवाल धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे सवाल उपस्थित केले आहे.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, महोदय, तुमचं सरकार सर्वात कलंकित सरकार आहे. म्हणून तर प्रकाश मेहता यांना घरी जावं लागलं नाही का, खोटी कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा लोकायुक्तांनी ठपका ठेऊनही सुभाष देशमुख यांना मुख्यमंत्री महोदय तुम्ही मंत्रीपदावरून काढू शकला नाहीत. अजून बऱ्याच भ्रष्ट मंत्र्यांनी घरचा रस्ता पकडला असता, मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृपादृष्टीने त्यांना तारलं असा आरोपही त्यांनी केला आहे.
मी स्वतः १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र क्लिनचिट मास्टर निघालात. हिंमत असेल तर तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी होऊ दया. मग तुमच्या सरकारवरील डागांचा हिशोब कळेल असा आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.