'राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडं इतिहासाचं आकलन नाही. तसंच, त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही. राजकारणात कुठलंही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतोय,' अशी टीका संभाजी बिग्रेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
संभाजी बिग्रेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करीत फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरीत पदार्पण केल्याबद्दल नुकतेच राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला होता. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी राजकारणातील जातीयवादावर भाष्य केलं होतं.' राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीय अस्मिता टोकदार झाल्या जात ही पुढाऱ्यांची ओळख बनली' अशी टीका राज यांनी केली होती. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींपर्यंत कुणी पोहोचवलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संभाजी बिग्रेडच्या प्रवीण गायकवाड यांनी टीका करीत म्हटले आहे की, 'राज यांनी ब्राम्हणत्व स्वीकारून प्रबोधनकारांचा वारसा सोडून दिला की काय? पुरंदरेंच्या विकृत लिखाणाचे समर्थन करताना राज इथल्या पुरोगामी चळवळींवर टीका करतात. इतिहासाची मांडणी करताना, अटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले आणि मराठ्यांचे पानिपत झाले'. म्हणजे विजयाचे श्रेय ब्राम्हण पेशव्यांना दिले जाते आणि पराभव मात्र मराठ्यांच्या माथी मारला जातो. हा जातीय दृष्टीकोनातून लिहलेला इतिहास नाहीतर दुसरे काय असा सवाल गायकवाड यांनी केला. तसेच आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरंदरेंच्या इतिहासलेखनाबाबत काय मते नोंदवली आहेत याचा तरी अभ्यास करायला हवा,' असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.