विविध माध्यमातून महापालिकेला उपलब्ध झालेल्या १२ लाख तिरंग्यांपैकी अवघ्या अडीच लाख झेंड्यांचे वितरण महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगामोहिमेच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेकडून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पाच लाख तिरंग्यांचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३०० केंद्रेही त्यासाठी करण्यात आली आहेत. त्यासाठी महापालिकेने पाच लाख झेंड्यांनी खरेदी केली असून कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) आणि शासनाकडून महापालिकेला एकूण बारा लाख झेंडे उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी महापालिकेला उपलब्ध झालेले झेंडे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते परत पाठविण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली होती.