कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या पालख्या आणि दिंड्यांना सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतरही वारकरी आणि भाविक चोरट्या मार्गाने पंढरपुरात प्रवेश करण्याची शक्यता आहे.मंगळवारी २० जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आणि चातुर्मासारंभ आहे.त्यामुळे राज्यातील कोणत्याही परिवहन विभागाने पंढरपूरसाठी आजपासून २५ जुलैच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकही बस सोडू नये,असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने दिले आहेत.
विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात आषाढीवारीला येत असतात. पंढरपूरचे अर्थकारण वारीवर अवलंबून आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. एसटी महामंडळही वारीसाठी खास बसची सोय करत असते.परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी,पालख्या आणि दिंड्यांना सरकारने बंदी घातली आहे.
त्यानंतरही काही भाविक चोरट्या मार्गाने पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.म्हणून १७ जुलैला दुपारी २ ते २५ जुलै सायंकाळी ४ पर्यंत सर्व जिल्ह्यांतील पंढरपूरची एसटी सेवा बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. आंतरराज्य व आंतरजिल्हा नाकाबंदी,पंढरपूर तालुका सीमा नाकाबंदी व शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
या काळात राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांनी एकही एसटी पंढरपूरसाठी सोडू नये तसेच पंढरपूर येथून आरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सर्व फेर्या तातडीने बंद कराव्यात,असेही आदेश सोलापूर विभागाच्या नियंत्रकांनी दिले आहेत.पंढरपूर वारीच्या काळात एसटी महामंडळाला दरवर्षी २२ ते २३ कोटी आणि रेल्वेला १ ते २ कोटींचे उत्पन्न मिळते.त्यावर यामुळे पाणी पडणार आहे.