काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. संजय राऊतांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा उल्लेख करून काँग्रेसमध्ये निर्णय राहुल गांधी किंवा गांधी कुटुंब घेत असल्याचं वक्तव्य केल्याबाबत नाना पटोलेंना विचारणा झाली. यावर नाना पटोलेंनी संजय राऊतांना चाटूगिरी आणि चोंबडेपणा करू नका, असं म्हणत शाब्दिक हल्ला चढवला.
नाना पटोले म्हणाले, “संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवारावर हे लांच्छन लावणं सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. गांधी परिवार त्यागाचा परिवार आहे. पंतप्रधानपद त्या कुटुंबाने सोडलं आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडलं आहे. मल्लिकार्जून खरगे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. ते अनेक वर्ष आमदार-खासदार होते.”
संघटनेत मल्लिकार्जून खरगे ब्लॉक अध्यक्षापासून काम करत आले आहेत. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव आहे. मल्लिकार्जून खरगेंच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणं आणि गांधी परिवारावर चुकीचा आरोप करणं म्हणजे चोमडेपणा आहे. संजय राऊतांनी हा चोमडेपणा थांबवावा. हे चुकीचं आहे. ते अशाप्रकारे दुसऱ्यांचे प्रवक्ते होतात,” अशी टीका नाना पटोलेंनी केली.
Edited By - Ratnadeep Ranshoor