Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
, शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (10:28 IST)
दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात श्री.ठाकरे म्हणतात, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे आगळेवेगळे स्मारक ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
 
हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्याय आणि बंधुतेचा विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसाचे जीवन सुसह्य व्हावे, त्याला त्याचे हक्क मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील.
 
या कार्यासाठी प्रेरणादायी ठरणारे इंदू मिल येथील  स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणारे नागरिक आणि भीमसैनिकांचे त्यांनी स्वागत केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार