Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. भारती पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद

डॉ. भारती पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद
, गुरूवार, 8 जुलै 2021 (07:27 IST)
दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या डॉ. भारती पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे. या अगोदर नाशिकमधून लोकसभेवर निवडून गेलेल कै. यशवंतराव चव्हाण यांना सरंक्षण मंत्रीपद मिळाले होते. पण, ते नाशिकचे रहिवासी नव्हते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खासदार डॉ. पवार यांच्या द्वारे नाशिक जिल्हयाला पहिल्यांदाच केंद्रातील पद लाभले आहे.
 
डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून निवडून गेल्या. याआधी  त्यांनी याच मतदार संघात राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. पण, त्यांनी चिकाटी सोडली नाही. त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. विविध आंदोलने केली. पण, त्यांना राष्ट्रवादीने २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत संधी न दिल्यामुळे त्या भाजपमध्ये गेल्या. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. निवडून आल्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा सुरु ठेवला. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली.
 
डॅा. भारती पवार यांचे माहेर व सासर हे दोन्ही नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातीलच आहे. त्यांचे सासरे माजी मंत्री कै. ए.टी. पवार हे कळवण विधानसभा मतदार संघातून सलग पाच वेळा आमदार झाले. त्यांनी बराच काळ राज्याचे मंत्रीपदही भूषविले. त्यामुळे राजकारणाचा वारसा त्यांना सासरकडून आला.
वैद्यकिय शिक्षण घेतलेल्या डॅा. भारती पवार या जिल्हा परिषदेतही दोन वेळेस निवडून गेल्या. येथे त्यांनी आपल्या कामाची छाप टाकली. त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी करण्याची संधी पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून मिळाली. त्यात त्यांना यश आले नाही. पण, दुस-या निवडणुकीत त्या भाजपकडून विजयी झाल्या. त्यांचे पती प्रवीण पवार हे अभियंता आहे.
पवार कुटुंबियांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी ते चव्हाट्यावर आणत नाही. त्यांचे दिर नितीन पवार हे ऱाष्ट्रवादीचे आमदार आहेत. पण, यांचा वाद कधीही जाहीरपणे समोर आला नाही. डॅा. भारती पवार यांनी याअगोदर पवार कुटुंब एकसंधच असल्याचे सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्यांच्यामुळेच मी आज मंत्री बनलो, मोदी जी जबाबदारी देतील, ती मी सांभाळेन