गेल्या ४२ दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा थेंब नाही, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा ही मागणी आ. अमरीश पंडित यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान उपस्थित केली. यावेळी बोलताना ते खूप भावुक झाले. त्यांची ही चर्चा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुढे चालू ठेवून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारला केली.
आ. अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत नियम ९७ अन्वये मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकर्यांचा सरकारवर विश्वास राहिला नाही, तरुण मुले आणि मुली आत्महत्या करत आहेत तरीही राज्यकर्ते हातावर हात ठेवून बसले आहेत. मराठवाड्याला हक्काचे पाणी कधी देणार, असा सवाल करुन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
मराठवाड्याला महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत असल्याचेही आ. पंडित यांनी मराठवाड्याच्या व्यथा मांडतांना सांगितले. उपसभापती यांनी त्यांना अडविल्यानंतर आ. अमरसिंह पंडित संतप्त झाले होते, शेतकर्यांच्या विषयावर आपणाला बोलू दिले जात नाही, मराठवाड्याच्या भावना सभागृहात मांडायच्याच नाहीत का, असा प्रश्न करताना भावूक झाले, मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आल्यानंतर मात्र काही क्षण विधान परिषद सभागृह स्तब्ध झाले होते. धनंजय मुंडे आणि उपसभापती यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पुढे बोलता आले नाही. या घटनेनंतर धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, सतिष चव्हाण, विक्रम काळे यासह आदी सदस्य मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर आक्रमक झाले. सभागृहात सत्ताधारी मंत्र्यांना मात्र समाधानकारक उत्तर देता आले नाही.