Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिओचा डोस म्हणून लहान मुलांना पाजले सॅनिटायझर, तीन जण निलंबित

पोलिओचा डोस म्हणून लहान मुलांना पाजले सॅनिटायझर, तीन जण निलंबित
, सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (22:34 IST)
प्रतिनिधिक फोटो
यवतमाळ जिल्ह्यातील कापसी कोपरी या ठिकाणी पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहानग्यांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायजर पाजण्याची घटना घडल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी व्हावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
 
यवतमाळ जिल्ह्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कापसी कोपरी येथे लसीकरणाचा कार्यक्रम झाला. त्या दरम्यान, लहान मुलांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायजर देण्यात आले. त्यापैकी एका मुलाला मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. या बालकासह इतर बालकांनाही दक्षता म्हणून यवतमाळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी असे आदेश प्रशाससनातर्फे देण्यात आले आहेत असं जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी सांगितले.
 
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून घटनेवेळी उपस्थित असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळे यांनी दिली. लसीकरणावेळी एक अंगणवाडी सेविका, एक आशा वर्कर आणि एक डॉक्टर असे तीन जण उपस्थित होते.
 
ज्या लहान मुलाला मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याचे वडील किसन गेडाम यांनी सांगितले. आम्ही एका मोठ्या संकटातून वाचलो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 
लसीकरणानंतर किसन गेडाम यांच्या मुलाला उलट्याचा त्रास सुरू झाला. ते म्हणतात, "गावामध्ये काल लसीकरणाचा कार्यक्रम होता. त्यात मुलांना पोलिओ डोस देण्याऐवजी सॅनिटायजरचा डोस देण्यात आला. त्यांनी आधी मुलांना सॅनिटायजरचा डोस दिला आणि नंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्या मुलांना पोलिओचा डोस देण्यात आला. त्यात माझ्या मुलाला उलट्यांचा त्रास व्हायला लागला. आम्ही त्याला दवाखान्यात दाखल केले. आम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलो."
 
आता सर्व बालकांची प्रकृती स्थिर आहे असं पांचाळे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विश्व हिंदू परिषदेचे नेते कृष्णकुंजवर