आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न रखडला आहे. त्यावरून विरोधकांकडून टीकाही केली जात आहे, पण अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
याच मुद्द्यावरुन विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर टीका करताना खडसे म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पाळणा हलला, पण इतर मंत्र्यांचा पाळणा अद्याप हलला नाही. डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही."
खडसे पुढे म्हणाले, "अनेक बंडखोर मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.पण आता सेना भवनातून काहीही ठरत नाही. दिल्लीला जाऊन परवानगी आणावी लागते."
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी मागणीही खडसे यांनी यावेळी केली.