शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. पहाटे 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला एका अज्ञात वाहनानेने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आता त्यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. विनायक मेटेंचा अपघात झाल्यानंतर त्यांना बराच वेळ मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या अपघाताची चौकशी केली जाईल. सर्व आरोपांची माहिती तपासली जाईल. तसेच ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विनायक मेटे यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "आम्ही विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो."
विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या आजच्या बैठकीला येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांचं अपघाती निधन झालं आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांची भावना होती, शासन त्यासोबत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.