Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचा दावा, पक्षाचा आदेश झुगारून नेमला नवा प्रतोद

Maharashtra political crisis
, बुधवार, 22 जून 2022 (15:50 IST)
सुनील प्रभु यांनी बोलावली बैठक आणि त्यांनी काढलेले आदेश अवैध आहेत, असा दावा आता एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
 
"शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत," असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.
 
शिवसेनेनं त्यांच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील देशमुख यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे.
 
शिवसेनेच्या सर्व आमदारांना ई-मेल, एमएमएस आणि व्हॉट्स ऍप द्वारे याची नोटीस पाठवण्यात आली आहे. 'सबळ कारण दिल्या शिवाय या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. तसंच बैठकीला उपस्थित राहिले नाहीत तर त्या आमदारांनी स्वेच्छेने पक्ष सोडण्याचा इरादा केल्याचं मानलं जाईल,' असं शिवसेननं आमदारांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
 
तसंच यानंतर आपल्यावर अपात्रेच्या कारवाईची शिफारस करण्यात येईल, असं इशारा या बंड केलेल्या आमदारांना देण्यात आला आहे.
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
 
ते लिहितात, 'संजय राऊत खुश!
 
कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.'
 
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. याचा अर्थ काय याचा उलगडा काही वेळात होईल असा कयास आहे.
 
मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे सर्वाधीक आमदार असल्याचं पुन्हा एकदा बोलून दाखवलं आहे. आता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहात आहेत. त्यांची कोरोनाची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री या बैठकीसाठी जमा झालेआहेत मात्र शिवसेनेचे गुवाहाटीला असणारे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहाणार नसल्यामुळे या बैठकीला काहीसं वेगळं रुप आलेलं दिसेल.
 
तत्पूर्वी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. तर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही भेटून या स्थितीवर चर्चा केली.
 
काँग्रेसच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे आमदार एकत्र आहेत. आम्हाला कोणीही प्रलोभन देऊ शकत नाही असं सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ration Card आता कुठून ही धान्य घेता येणार