महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने मंगळवारी त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिंदे यांना गेल्या आठवड्यापासून घशाचा संसर्ग आणि तापाचा त्रास होता. आपल्या प्रकृतीबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे म्हणाले, “सगळं ठीक आहे.” "मी ठीक आहे, काळजी करू नका," शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आले.
शिवसेनाचे नेते उदय सामंत म्हणाले, ही त्यांची नियमित तपासणी होती. नंतर ते पुन्हा वर्षा बंगल्यावर परततील.त्यांना घशाचा संसर्ग, ताप आणि अशक्तपणा जाणवत आहे .त्यांच्या रक्ताची तपासणी घेण्यात येणार आहे.
भारतीय जनता पक्ष (भाजप) 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीत व्यस्त आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शपथविधीच्या तयारीबाबत चर्चा केली. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे महाजन यांनी पत्रकारांना सांगितले. महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.