जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात रेल गावात दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेचे कान कापून 10 -12 ग्राम सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विमलबाई श्रीराम पाटील असे या पीडित वृद्ध महिलेचे नाव आहे. विमल बाई या गावातील मंगल नत्थू पाटील यांच्या लोखंडी पत्राच्या शेड मध्ये राहतात. 29 डिसेंबर रोजी अज्ञात दरोडेखोर मध्यरात्री चोरी करण्यासाठी त्यांच्या शेडमध्ये शिरला आणि त्याने खाटेवर झोपलेल्या विमलबाईंचे दागिने चोरण्यासाठी त्यांचा कानच कापला. चोराने त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून सुमारे 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला.
दररोज प्रमाणे आजी लवकर उठल्या का नाही म्हणून शेजारची बाई त्यांना बघायला गेली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित महिला रक्तबंबाळ झाली असून तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी अज्ञात दरोडेखोराच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेत आहे.