श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कारभारातील कथित अनियमिततेच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माहिमचे आमदार सदा सरवणकर यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टने मार्च 2020मध्ये युपीमधील एका कंपनीकडून तब्बल 15,000 ते 16,000 लीटर तूप खरेदी केले होते. मात्र, त्याच वर्षी कोविड-19 साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे या काळात मंदिर बंद ठेवण्यात आले होते. ज्यामुळे यावेळी येथील ट्रस्टींद्वारे हे तूप विकण्यात आले.
2021 मध्ये मंदिरे उघडल्यानंतर लगेच मंदिर ट्रस्टने त्यांच्याच विश्वस्तांशी संबंधित एका सॉफ्टवेअर कंपनीला क्यूआर कोड-आधारित मंदिर दर्शन प्रणाली सुरू करण्याचे कंत्राट दिले. साधारणपणे या कामासाठी सुमारे 40 ते 50 लाख रुपये एवढा खर्च येतो. परंतु क्यू आर कोडच्या विकासासाठी आणि ऑपरेटिंगसाठी 3.5 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे हा भ्रष्टाचार आणि गैरकारभारच आहे, याव्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. याशिवाय मंदिराच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीच्या कामात देखील अनेक अनियमितता आहेत. त्यामुळे या सगळ्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी सदा सरवणकर यांनी केली. त्यावर फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच या चौकशीचा अहवाल महिनाभरात सादर करणार असल्याचे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor