मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका, आणि आरोग्य विभाग यांनी व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
मुंबई शहरातील गोवर प्रार्दुभावामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्याच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याठिकाणी त्यांनी महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढाव बैठकही घेतली.
या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपचारांबाबत आणि अनुषंगिक बाबींची माहिती घेतली. नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण न झाल्यामुळे बालकांमध्ये प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. याबाबत महापालिकेची आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेने तातडीची उपाययोजना म्हणून एका मोहिमेत सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केले आहे. लसीकरणापासून दूर राहिलेल्या बालकांना लस देण्याबाबत संबंधित सर्वच क्षेत्रात जाणीव जागृती करण्यात येत आहे. तेथील लोकप्रतिनिधींपासून महत्वाच्या आणि प्रमुख अशा व्यक्तींशी संपर्क साधण्यात येत आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे बालकांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या आणि आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. बालकांना चांगले उपचार मिळावेत यासाठीही निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व परिस्थितीवर आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी सतर्कपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही दिल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पर्यटन तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
Edited By- Ratnadeep Ranshoor