Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लातूर जिल्ह्याच्या परंपरेतला शेत महोत्सव “येळवस”…!!

farmer festival latur
, गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:26 IST)
लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येत्या रविवार, दि. 2 जानेवारी रोजी समुद्राला जशी, पाण्याची भरती येते… तशी शेताशेतात माणसाची, भरती येते… कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळामावस्या….. हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा. 2 जानेवारी रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात भरेल, यावेळी कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत, त्या सांभाळून वेळामावस्या साजरी होईल. त्या विषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच.!!
 
कसा असतो सोहळा…!!
 
वेळामावस्येच्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो…आणि वेळामावस्येच्या पहाटे घराघरात चूल पेटते… बेसनपिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेले उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी… म्हणजे भज्जी… ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी, मी आजपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो, वेगवेगळे पदार्थ खाले पण भज्जीसारखी अफलातून चव कशाला म्हणजे कशाला नाही …या डीशची तुलना कोणतेही पंचतारांकित हॉटेलही करु शकणार नाही…. या बरोबर दिले जाणारे अंबील म्हणजे तर राज दरबारी असलेले सगळे पेय फिके पडावेत असे…चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते ते अंबिल ( काही जणांचे तोंडही सुजतात दुस-या दिवशी जादाचा डोस झाल्यामुळे ). भल्या थोरल्या भाकरी…… गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो. एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो…!!
 
काय आहे परंपरा
 
भारतीय व्दिपकल्पात सिंधु संस्कृती पासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा ,यमुना , गोदावरी , सरस्वती ,नर्मदा ,सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तीला लातूर जिल्ह्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी, सहारा देणारी ,पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळा आमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करुन भक्ती भावाने केली जाते. सकाळी पूजाकरुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते….. जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही, पोटाला तडन लागते. जेवणाच्या पात्रावरुन उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे खालेले जिरवण्याचा प्रयत्न करायचा…. १२ बलुतेदार ,आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने हा हे सगळे खावू घातले जाते. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे, आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करुन ती शमली की तीच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे. असा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे….. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार ( माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या सह अनेकांचे दैवत ), गाढवांचा बाजार, सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले तृतीयपंथी दर्शनाला येतात (तृतीयपंथांचे माळेगाव अशीही ओळख ), तमाशाचे मोठ मोठे फड….. यामुळे या जत्रेला पुरुष मंडळीच्या दृष्टीने ख-या अर्थाने चांगभलं (या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार नाही )….. असा हा सण आणि त्याची परंपरा आहे आजही मोठे हौसेनी सांभाळली जाते… कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेऊन आणि गर्दी करु नये म्हणून प्रशासनाने आवाहन केले आहे… प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून ही वेळामावस्या साजरा करतील…!!
 
@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंटरनेट शटडाऊन मुळे जागतिक आर्थिक नुकसान