नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेले सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. राजेंद्र चंद्रकांत मोरे असे हल्लेखोराचे नाव असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, की डॉ. राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या पीआरओ म्हणून काम करीत होत्या. सन २०२२ मध्ये डॉ. राठी यांची रोहिणी यांचे पती राजेंद्र मोरे यांच्यासमवेत ओळख झाली. काही काळानंतर त्यांनी मोरे यांच्या माध्यमातून म्हसरूळ परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला होता. गेल्या दीड वर्षात डॉ. राठी यांनी मोरेला अनेक वेळा व्यवहारापोटी पैसे दिले होते. या पैशांसाठी राठी यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता.
दरम्यान, राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते. डॉक्टर आपली बाहेर बदनामी करीत आहेत, असा संशय आल्याने राजेंद्र मोरे याच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला. शुक्रवारी रात्री तो डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांचे शाब्दिक वाद झाले.
दरम्यान, डॉ. राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेला. त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृति चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास १५ ते २० वार केले आहेत. राजेंद्र मोरे हल्ल्यानंतर पसार झाला असून, पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor