औरंगाबादमध्ये फटाका मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे २०० फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र या भीषण आगीत सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. प्राथमिक अहवालानुसार या भीषण आगीत दीड ते दोन कोटींचं नुकसान झालं आहे..
शहरातील गजबजलेल्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षीप्रमाणे फटाके मार्केट भरवण्यात येतो. यंदा मोठ्या उत्साहाने फटाका मार्केट स्टॉल सजवण्यात आले. मात्र, औरंगाबादकरांच्या दिवाळीला गालबोट लागले. फटाका मार्केटला अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. अवघ्या काही तासांत २०० फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली आहेत . या आगीत अनेक वाहनं आगीच्या भस्मसात झाली आहे. परिसरात धुराचे मोठे लोट दूरहुन दिसत होते. गंभीर बाब म्हणजे निवासी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.