Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात होलसेल साडीच्या डेपोला लागलेल्या आगीत 5 कामगारांचा मृत्यू

पुण्यात होलसेल साडीच्या डेपोला लागलेल्या आगीत 5 कामगारांचा मृत्यू
पुणे , गुरूवार, 9 मे 2019 (10:09 IST)
सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपोच्या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. तसेच सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले आहे. राकेश रियाड (वय २२),धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही  राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३),रा. लातूर  असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.
 
पहाटे सव्वा चारच्या दरम्यान या दुकानात आतमध्ये  झोपलेल्या कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. चोरी होऊ नये या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप  लावण्यात येत असे. आतमध्ये पाच कामगार झोपले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. असा फोन दुकानच्या मॅनेजरला आला. मात्र मॅनेजर दुकानापर्यंत पोहचेपर्यंत मोठी आग लागली होती. बाहेरून कुलूप  काढल्यानंतर दुकानात कपडे असल्याने आगीने जोरात पेट घेतला. यानंतर दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडून  पाठीमागच्या बाजूने  भिंत तोडण्यात आली. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आली.  मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही.  त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. सुमारे सात हजार स्केअर फुटच्या या दुकानात साडी  व रेडीमेड कपड्याचे दालन होते. चार राजस्थानचे तर एक लातूरचा कामगार राहण्याची सोय नसल्याने या दुकानातच आतमध्ये राहत होते. देवाची  ऊरळी येथील राजु भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि आठ ते दहा टॅंकरने ही आग विझविण्यात आली. सकाळी पावणेसातच्या सुमारास या दुकानामधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुष्काळाशी दोन हात करायला व्हॉटस्ॲपची मदत