राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाडके नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च आणि हार-तुरे, होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत आपला वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतले असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोविड महामारीने सध्या गंभीर स्वरुप धारण केले आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. या यंत्रणेला समाजाकडू जितकी अधिक मदत होईल, तितकी या महामारी विरुध्दची आपली सर्वाची लढाई सार्थक आणि समर्थ होत जाणार आहे. या स्थितीचा विचार करता येत्या २७ मे रोजी असलेला माझा जन्मदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याह व्यक्ती किंवा संस्थेने हारतुरे, मोठी वा छोटी आयोजने, होर्डिंग्ज, जाहिराती या स्वरुपात खर्च करु नये. तो खर्च कोरोना विरोधी लढयासाठी करावा. आपण सगळेच समाजाचे देणे लागतो. समाजातील शेवटच्या माणसासाठी सध्या आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. त्या यंत्रणेकडे संसाधनांचा अभाव आहे. तो कमी करण्यासाठी प्रत्येकाने फूल ना फुलाची पाकळी या स्वरुपात आपापल्या स्तरावर योगदान द्यावे. रक्तदान, प्लाजमा डोनेशन इत्यादी प्रकारचे उपक्रम/कार्यकम आयोजित केल्यास आपल्या सर्वांच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या असे मी समजेन, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.