इगतपुरी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांच्या समूळ उच्चाटनाचे आदेश दिलेले आहेत.
याअंतर्गत इगतपुरी येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याची काही संशयित इसम वन्यप्राणी बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुधवारी सकाळी मिळालेल्या सापळा रचून कथित बाबासाठी बिबट्याच्या कातडीची गादी बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीस अटक केली आहे.
या टोळीत इगतपुरी तालुक्याचे रहिवासी असलेले संशयित नामदेव दामू पिंगळे (वय 30, रा. पिंपळगाव मोर), संतोष सोमा जाखेरे (वय 40, रा. मोगर), रवींद्र मंगळू आघाण (वय 27, रा. खैरगाव), बहिरू ऊर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी (वय 50, रा. पिंपळगाव मोर, वाघ्याची वाडी) व बाळू भगवान धोंडगे (वय 30, रा. धोंडगेवाडी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील गोणपाटातून वन्यप्राणी बिबट्याची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त केला आहे. ही कातडी परीक्षणासाठी नाशिकच्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे पाठविली असता ती बिबट्याचीच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पुढील तपास इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांचे पथक करीत आहे.
याबाबत सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखेरे याचा साथीदार संन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती. त्यासाठी यातील आरोपी नामदेव दामू पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लच वायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याला पकडून ठार मारले. यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्याची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस पथक शोध घेत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार गोकावे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा संदिप नागपुरे, चेतन संवस्तरकर, मेघराज जाधव, हेमंत गरुड, पो. ना. विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor