Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

२ पट्टी मिळतेय, कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी अनुदान द्या, शेतकरी मुलाचे राष्ट्रपतींना पत्र

farmer
, गुरूवार, 2 मार्च 2023 (08:07 IST)
महाराष्ट्रातील शेतकरी सातत्यानं अनेक संकटांना तोंड देत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कांदा, सोयाबीन, कापसाच्या दरातील घसरणीमुळं चिंतेत आहेत. आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. ५१२ रुपये किलो कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याला अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. तर, दुसरीकडे ८२५ किलो कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याला १ रुपया व्यापाऱ्याला द्यावा लागला. नाशिक ते सोलापूर कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. आता अहमदनगरच्या युवकानं थेट कांद्याचा प्रश्न राष्ट्रपतींच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्पादनाला दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी थेट पिकात रोटर फिरवत आहेत. आता उभ्या पिकांवर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या, अशी मागणी महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे. यासाठी त्याने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. ही परिस्थिती केवळ कांदा उत्पादकांचीच नाही तर कोबी, फ्लॉवर, केळी यांसारखी पीके घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची आहे. या शेतकरी पुत्राचे नाव शुभम गुलाबराव वाघ असून, तो जामखेड येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
webdunia

webdunia
शेतकरी पुत्राने राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात नेमके काय म्हटले?
 
महोदया,
 
आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे ५०० ते ६०० किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
 
एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रकमे इतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाही. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढते. त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाही. आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. कुठलेही पीक घेतले तरी तिचे अवस्था आहे. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 
शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटले तरी २००० ते २५०० रुपये खर्च येतो. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथे शेतमाल विकला नाही, तर तिथे शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागते. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.
 
आज शेतकऱ्यांना दोन रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळते, पण तोच कांदा बाजारात सर्वसामन्यांना २० रुपये किलोने विकला जातोय. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचे का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जाते, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे. आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर दोन हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे.
 
- आपला विश्वासू
शुभम गुलाबराव वाघ
राजमाता जिजाऊ नगर,
नवीन बस स्टँड समोर, जामखेड, ४१३२०१ ता- जामखेड,
जि. अहमदनगर दि-०१ मार्च २०२३

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंबानींसह बच्चन, धमेंद्र यांचे घर उडवण्याची धमकी