मराठा समाजाच्या उमेदवारांना शासनाच्या अधिनियमातील कलम 18 नुसार नियुक्ती देण्यात यावी. यासाठी हा विषय विधीमंडळात मांडण्यात येईल. मात्र, तरीही या प्रश्नाला सरकारने न्याय मिळवून दिला नाही, तर विधीमंडळाचे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. सकल मराठा समाज महाराष्ट्रच्यावतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली.
प्रविण दरेकर यांनी मराठा समाजाच्या सुमारे 3500 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी केली. ते म्हणाले, “आमच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या अधिनियमानुसार या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतू विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचादरम्यान काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये ‘खो’ घातला. तसेच हा विषय न्यायालयात योग्य पध्दतीने मांडला नाही. त्यामुळे या मराठा समाजाच्या या उमेदवारांवर अन्याय झाला.”