पणजी : महाराष्ट्र सरकारने गोव्याच्या सीमेवर विर्डी येथे वाळवंटी नदीवर धरण उभारण्याचा जो प्रयत्न चालू केला आहे, त्यास गोवा सरकारने आक्षेप घेतला असून आज मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नियोजित धरण प्रकल्पास आक्षेप घेणार आहेत. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दै. तऊण भारतशी बोलताना सांगितले की, या धरण प्रकल्पासंदर्भातील वृत्ताची दखल गोवा सरकारने घेतली आहे. आपण जलस्रोत खात्याचे अभियंता दिलीप नाईक यांना विर्डी येथे पाठविले. त्यांनी तिथे जाऊन महाराष्ट्र सरकारने जी काही कामे हाती घेतली आहेत, त्याची पाहणी केली आहे. मंत्री शिरोडकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणतेही पक्के बांधकाम हाती घेतलेले नाही, मात्र तिथे काही यंत्रणा वापऊन साफसफाईचे काम हाती घेतले आहे. जमीन सपाटीकरण करणे वगैरे छोटी छोटी कामे हाती घेतलेली आहेत. हिच कामे हाती घेऊन पुढे धरणाचे काम देखील महाराष्ट्र सरकार कऊ शकते.
म्हादईप्रकरण अगोदरच सर्वोच्च न्यायालयात
आपण यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्री सावंत हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विर्डी धरणाला आक्षेप घेणार आहेत. गोव्याला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम हाती घेऊ नये, कारण म्हादईप्रकरण अगोदरच सर्वोच्च न्यायालयात आहे. विर्डी येथील वाळवंटी नदी हा देखील म्हादई नदीचाच भाग आहे. सांखळीच्या वाळवंटी नदीचा मुख्य प्रवाह या विर्डीतून येतो व घोटेली-केरी येथे दोन नद्यांचा संगम बनून सांखळीपर्यंत जाणारी मुख्य वाळवंटी नदी बनते.
Edited by : Ratnadeep Ranshoor