Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारकडून वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय

सरकारकडून वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय
, बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (09:26 IST)
कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून  या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद )च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे तसेच सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून विविध योजनांमध्ये कृतीसंगमाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
 
या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावरून गावनिहायमाहिती प्राप्त करून एकल/विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समुहामध्ये प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार विशेष बाब म्हणून एकल/विधवा महिलांचा किमान पाच महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात येणार असून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या समुहातील सदस्यांना फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधीही अदा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या एकल/विधवा महिलांना पीएमजेजेबीवाय व पीएमएसबीवाय योजनेचे 342 रूपये निधी भरण्यास बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या महिलांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ देण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.
 
उमेदमार्फत एकल/विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक/युवतींना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येणार आहे. आरसेटी योजनेअंतर्गत 18 ते 45 या वयोगटातील युवक-युवतींना 10 ते 45 दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
केंद्र सरकारच्या उन्नती योजनामध्ये पात्र असलेल्या एकल (विधवा) महिलांना प्रशिक्षण देताना प्रथम प्राधान्य असणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रशासन सहाय्यीत योजनेतही अशा एकल/विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे बिज भांडवल देण्यात येणार आहे. कोरोना महामारीत घरातील कर्त्या पुरूषांच्या अकाली निधनाने कुटुंबांवर जी आपत्ती ओढविली, ती या शासन निर्णयाद्वारे काही प्रमाणात तरी दूर होईल, असा विश्वास हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर मंत्री श्री.मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णसंख्येतही घट