गेल्या आठवडाभरापासून पावसाळी अधिवेशन असून आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला असून काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिर प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. अनेक दिवस हा वाद सुरु होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात देखील फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. एसआयटीकडून या प्रकरणात एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणांवर भाष्य केले. ते म्हणाले की, अशा प्रकारची परंपरा आहे का? हा वाद अजून सुरू आहे. कोणीतरी येतं आणि अशी घटना घडवत.
मागील वर्षी 2022 मध्ये ही मिरवणूक ते थेट आतमध्ये घेऊन गेले. या ठिकाणी सेल्फी आणि फोटो काढण्यात आले. हा समोरून प्रकार आमच्या भावना दुखावण्याचा आहे. दोन्ही बाजूंची बैठक झाली. त्यामध्ये संबंधित समुदायाने माफी मागितली आहे. जे लोक त्या ठिकाणी होते, त्यांना नोटीस देण्यात आली.
आपल्याकडे धर्म आणि परंपरा यात अंतर आहे. जगन्नाथ रथ आजही एका मुस्लिम व्यक्तीसाठी थांबतो. आपल्याकडे अनेक प्रथा आहेत. ज्याला मनात गोविंद बाळगायचा आहे, त्यालाही कारवाईला सामोरे जावं लागेल का? असा सवाल करत पाटील यांनी राज्यातील ही परंपरा आहे. याच्या आड येणं हाच राजद्रोह असून यावर शासनाने खुलासा करावा, असे आवाहन पाटील यांनी फडणवीस यांच्या प्रश्नावर केले आहे.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही धर्म श्रध्दा पाळण्यास शासन आडवं येणार नाही. एखाद्या ठिकाणी परंपरेच्या आड काही खोडसाळ पणा होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. ठराविक समुदायाने केलेल्या कृत्यामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होते. ते योग्य नाही जिथे श्रध्दा सर्व समावेशक असते. तिथे शासन त्यांच्या पाठीशी आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टीने केलेल्या तक्रारीचे नोंद घेण सरकारच काम आहे. नागपूरमधील दर्गाच्या विकासासाठी मी पैसे दिले. पण एखादा म्हणत असेल, मशिदीसमोर जाऊन आम्हाला नाचायचं आहे, हे योग्य नाही. सर्वानी एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे.
एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार…
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश प्रकरण झाले, त्यावेळी एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते . तसेच या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्यात आली होती. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, असेही असांगण्यात आले होते. त्यावर आज पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी SIT कडून या प्रकरणात एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार असल्याचे सांगितले.
नेमकं काय घडलं होते?
त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर हे सायंकाळी नऊ वाजता बंद करण्यात येते. उत्तर दरवाजाच्या ठिकाणी जमाव आलेला होता. यावेळी त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केलेली होती. परंतु त्यांना प्रवेश हा नाकारण्यात आला. त्यामुळे एका बाजूने मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठीचा हट्ट आणि दुसरीकडनं सुरक्षा रक्षकांकडून त्यांना केला जाणारा मज्जाव, त्यामुळे हा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर देवस्थानला माहिती मिळाल्यांनतर देवस्थानचे इतर व्यक्ती तिथे आलेले होते आणि त्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला.