Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यपाल कोश्यारी पंतप्रधान नरेंद्र मोदीनां म्हणतात, 'मला पदमुक्त करा'

bhagat sing koshyari
मंगळवार, 24 जानेवारी 2023 (09:22 IST)
राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर आलेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे.राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालवण्याचा मानस पंतप्रधानांना कळवल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.
 
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.
 
"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
“राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही .
 
"याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपाची भावना दिसते. महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? जाहीर निषेध”! असं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात, “काँग्रेसने अनेकदा राज्यपालांसंदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे. संवैधानिक व्यवस्थेचा अपमान ते करत होते. राज्याच्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना तातडीने काढावं अशी आमची मागणी होती. राजभवन भाजपभवन झालं होतं. राज्यपालांविरोधात राष्ट्रपतींकडेही लेखी मागणी केली होती. भाजपला त्यांना राज्यातच ठेवायचं होतं.
 
"राज्यपाल उद्या जाणार असतील तर ते आजच जायला हवेत अशी आमची मागणी होती. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं करणारी व्यक्ती पुरोगामी राज्याच्या राज्यपालपदी बसणं हेच अपमान होतं. ते पद सोडत असतील तर त्याचं स्वागतच आहे”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“यापूर्वी ते आम्हाला सांगायचे की मला जायचं आहे. आता त्यांनी लेखी विनंती केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता त्याचा विचार करेल”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यातील मराठी माणूस, महापुरुषांचा अपमान यांसारख्या विविध मुद्द्यांवर राज्यपालांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. राज्यपालांविरोधात राज्याच्या विविध जिल्ह्यात त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आलं होतं.
 
कोण आहेत कोश्यारी?
उत्तराखंडच्या बगेश्वर जिल्ह्यात भगत सिंह कोश्यारी यांचा 17 जून 1942 रोजी जन्म झाला. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य होण्याआधी उत्तर प्रदेशचा भाग होता. त्यामुळं कोशियारींचं बालपण, शिक्षण आणि सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभही उत्तर प्रदेशातच झाली. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. 1961-62 या काळात ते अलमोडा कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेत कार्यरत होते.
 
पेशानं शिक्षक आणि पत्रकार असलेल्या कोश्यारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सामाजिक कामास सुरुवात केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले.
 
उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री
कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरूवात संघातूनच झाली.
 
इंग्रजी विषयात एमएची पदवी मिळवलेल्या कोश्यारींनी शिक्षक म्हणूनही काम केलं. ते उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा इंटर कॉलेजमध्ये काही वर्षे व्याख्याते (लेक्चरर) होते.
 
कोश्यारींनी पत्रकारितेतही योगदान दिलंय. 1975 पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत.
 
समाजकारण, राजकारण यांसह साहित्य हाही कोश्यारींच्या आवडीचा प्रांत आहे. 'उत्तरांचल प्रदेश क्यों?' आणि 'उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान' ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
 
आणीबाणीविरोधात कोश्यारी यांनी आवाज उठवला होता. परिणामी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. 3 जुलै 1975 ते 23 मार्च 1977 असे तीन वर्षे ते तुरुंगात होते.
उत्तराखंडमधील शिक्षण क्षेत्रात कोश्यारींनी काम केलंय. पिठोरागड येथील 'सरस्वती शिशू मंदिर', 'विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज' आणि 'नैनिताल येथील सरस्वती विहार उच्च माध्यमिक शाळा' या संस्थांचीही स्थापना भगत सिंह कोशियारींनी केली.
 
अविवाहित असलेल्या भगत सिंह कोश्यारींनी अवघं आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कामासाठी घालवलं आहे.
 
कोश्यारींनी ट्रेकिंग करायला आवडतं. तत्त्वज्ञान, इतिहास आणि शिक्षण या विषयांची पुस्तकं त्यांना वाचायला आवडतात.
 
उत्तर प्रदेशपासून 2000 साली वेगळं झालेल्या उत्तराखंड राज्यात भाजपची धुरा कोश्यारींच्या हाती देण्यात आली. ते उत्तराखंडचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर उत्तराखंड राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होण्याच मानही त्यांना मिळाला.
 
भगतसिंह कोश्यारींनी केलेली वादग्रस्त विधानं
भगतसिंह कोश्यारी यांच्यामुळे अनेक वाद निर्माण झाले. त्यामुळे राज्यात गदारोळ देखील झाला होता आणि त्यांना काढून टाकण्याची सातत्याने मागणी होत होती.
 
1. 'गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 29 जुलै 2022 रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली. या चौकाचं नामकरण दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असं करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, "राजस्थानी मारवाडी समाजाने व्यावसाय करताना केवळ पैसा कमवला नाही, तर शाळा-महाविद्यालये दवाखाने बांधली आणि गोरगरिबांची सेवा केली. हा समाज देशात तसेच नेपाळ, मॅरिशस आदी देशांमध्ये देखील आहे. हा समाज जातो तेथे आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो."
 
"महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही," असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
या वक्तव्यानंतर वाद झाल्यानंतर स्पष्टीकरणात कोश्यारी म्हणाले की, "मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. "काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले.
 
"म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही." असं ते म्हणाले.
 
2.‘समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते.
 
“चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं,” अशा आशयाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं. पण नंतर या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं.
 
ते यावेळी म्हणाले होते, "आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात," असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं.
 
3. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान
भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता.
 
त्यावेळी कोश्यारी म्हणाले, "कल्पना करा की सावित्री बाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतिचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील?
 
"एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं होतं.
 
महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याबाबत कोश्यारींनी वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचं लग्न झाले तेव्हा ते 13 आणि 10 वर्षांचे होते. त्या वयात मुलगा मुलगी काय करतात. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केली होती.
 
4. नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे भारत कमकुवत
"भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला," असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.
 
कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते.
 
पंडित नेहरूंबद्दल बोलताना कोश्यारी म्हणाले, "पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं."
 
"अटल बिहारी वाजपेयींचं सरकार वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं," असं मत कोश्यारी यांनी व्यक्त केलं.
 
यावेळी कोश्यारींनी वाजपेयी सरकारचं कौतुक केलं. वाजपेयींनी अणुचाचणी करून भारताची कणखर प्रतिमा जगाला दाखवल्याचं कोश्यारी म्हणाले होते. त्यावरूनही प्रचंड वादंग निर्माण झालं होतं.
 
5. 'शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत'
कोश्यारी हे 19 नोव्हेंबर 2022 रोजी औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं. या दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केलं.
 
ते म्हणाले, "आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे, ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे."
 
"मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.
 
"शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकरा यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील," असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
 
ही झाली भगतसिंह कोश्यारींची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका. आता त्यांच्या राज्यपाल म्हणून कारकीर्दीमुळे झालेल्या वादाकडे येऊया. कारण राजभवनात बसून ‘समांतर सरकार’ चालवत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोश्यारींवर सातत्यानं होत होता.
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

National Girl Child Day 2023 :राष्ट्रीय बालिका दिवस महत्त्व आणि उद्दिष्टये