नाशिकमध्ये वयस्कर नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो असं सांगून अनेक ज्येष्ठ नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला बेड्या ठोकण्यात येवला पोलिसांना यश आलं आहे.
याबाबत असे की, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो असं सांगून फसवणूक करायचा. तो एटीएमजवळ उभा राहायचा. तिथे येणाऱ्या वयस्कर नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो, असं सांगायचा. काही ज्येष्ठ नागरिक त्याला एटीएमचा पिनही सांगायचे. पण एटीएममधून पैसे यायचे नाहीत. खरंतर तो पैसे काढायचाच नाही. तो वयस्कर नागरिकांना एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या एटीएममधून पैसे काढावे लागतील, असं सांगायचा.
यावेळी आरोपी वयस्कर नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून घ्यायचा. त्यानंतर तो वयस्कर नागरीक गेले की एटीएममधील पैसे काढायचा. अशाप्रकारे त्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. याबाबतची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यानुसार आरोपीला रंगेहाथ पकडण्यास पोलिसांना यश आलं.
पोलिसांनी त्याच्याजवळील सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.