Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या मेडिकल चालकासह तिघांना बेड्या; 21 इंजेक्शन जप्त

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या मेडिकल चालकासह तिघांना बेड्या; 21 इंजेक्शन जप्त
, मंगळवार, 11 मे 2021 (13:33 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये  रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका मेडिकल दुकानदाराचाही समावेश आहे. मेडिकल दुकानदार अन्य दोघांना रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किमतीने विकण्यासाठी देत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई करण्यात आली आहे.
 
शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय 34, रा. जयमल्हार नगर, दत्तकॉलनी, थेरगाव), कृष्णा रामराव पाटील (वय 22, रा. 16 नंबर बस स्टॉप, थेरगाव), निखील केशव नेहरकर (वय 19, रा. बिजलीनगर चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी शशिकांत याचे चिंचवड येथे आयुश्री मेडीकल आहे. आरोपी कृष्णा एका रुग्णालयात नर्सिंग स्टाफ आहे. तर आरोपी निखिल हा डिलिव्हरी बॉय आहे.
शशिकांत याच्या सांगण्यावरून कृष्णा आणि निखिल हे दोघेजण गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने विकत होते. दोन इंजेक्शनची डिलिव्हरी घेऊन रविवारी पहाटे  पावणेतीन वाजता हे दोघेजण दोन दुचाकीवरून जात होते. काळेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या   नाकाबंदीमध्ये दोघेजण अडकले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आले.
 
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विक्री परवाना बाबत त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा औषध विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात ते मेडिकल चालक शशिकांत पांचाळ याच्या सांगण्यावरून ते इंजेक्शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी देखील दोघांनी अशा प्रकारे इंजेक्शन विकून पांचाळ याला पैसे आणून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
 
त्यानुसार पोलिसांनी शशिकांत पांचाळ याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची (एम एच 14 / डी ए 4881) झडती घेतली असता सीटच्या खाली 19 रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एकूण 21 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केली.
 
आरोपींकडून शासनासह कोरोना रुग्णांची फसवणूक
पोलिसांनी जप्त केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची अलॉटमेंट गोदावरी मेडीकल स्टोअर्स (इनहाऊस क्रिस्टल हॉस्पिटल ) व आयुश्री मेडीकल स्टोअर्स (संलग्न ओनेक्स हॉस्पिटल) या हॉस्पिटलच्या नावाने झाली आहे. या दोन्ही हॉस्पिटलच्या नावाने वितरित करण्यात आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन हे आयुश्री मेडीकल स्टोअर्सचे केमिस्ट शशिकांत पांचाळ यांच्या ताब्यात मिळाले आहेत. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि बिलाशिवाय इंजेक्शनची विक्री केली. या प्रकरणात आरोपींनी रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने वाटप केलेल्या हॉस्पिटलमध्ये न देता शासनाची तसेच पर्यायाने त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रुग्णांची फसवणूक केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल