लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर येत असताना देशातील राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसतं आहे. भाजपाप्रणीत एनडीए आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये या निवडणुकीत जोरदार टक्कर होती. लोकसभा निवडणुकीचे कल हाती येत असताना देशात एनडीएला 295 तर इंडिया आघाडीला 230 जागांवर आघाडी आहे.
तर महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीला 18 जागांवर तर महाविकास आघाडीला 29 जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसून येतंय.
अर्थात यातील बहुतांश जागांमध्ये अतिशय अटीतटीची टक्कर दिसून येत असल्यामुळे कधी एखाद्याला उमेदवाराला आघाडी तर नंतर तोच उमेदवार पिछाडीवर असे चित्र या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसून येतं आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली होती.
त्यात महायुतीकडून भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांनी निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे मुख्य घटक पक्ष होते. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत फारसा प्रभाव पडलेला दिसून आला नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांत मोठा बदल म्हणजे काँग्रेसचे जोरदार पुनरागमन.
या लोकसभा निवडणुकीतून कॉंग्रेसनं महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केलं आहे. तसा महाराष्ट्र हा पारंपारिकदृष्ट्या कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून भाजप आणि एनडीएनं इथं मुसंडी मारली होती.
इतकी की 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागांवर विजय मिळाला होता. यातील 23 भाजपाच्या तर 18 शिवसेनेच्या होत्या. त्याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसला 4 आणि कॉंग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं 25 जागा लढवून फक्त एकाच जागेवर विजय मिळवला होता. तर यंदाच्या निडवणुकीत कॉंग्रेसनं 15 जागांवर निवडणूक लढवली होती.
सध्या हाती येत असलेल्या कलांवरून कॉंग्रेसला 12 जागांवर आघाडी मिळालेली आहे. म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा कमी जागा लढवून देखील कॉंग्रेसने या निवडणुकीत अधिक जागा जिंकून जोरदार यश मिळवलं आहे.
विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये तो कॉंग्रेसला गमवावा लागला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस हा बालेकिल्ला पुन्हा मिळवला असल्याचं दिसतं आहे.
विदर्भाबरोबरच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातदेखील कॉंग्रेसची कामगिरी उजवी ठरली आहे. किंबहुना महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा कॉंग्रेस पक्षाला मिळतील असं आतापर्यतच्या आकडेवारीतून दिसतं आहे.
कॉंग्रेसच्या या पुनरागमनामागचं विश्लेषण करताना ठळकपणे समोर येणारे आणि कॉंग्रेसच्या बाजूने सकारात्मक ठरलेले 5 ठळक मुद्दे पाहूया.
1. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा
राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाला नवसंजीवनी मिळाली. लोक कॉंग्रेस पक्षाशी पुन्हा एकदा जोडले गेले.
राहुल गांधींची प्रतिमा यातून मोठ्या प्रमाणात बदलली आणि देशभरात लोक राहुल गांधीशी जोडले गेले. याचा सकारात्मक परिणाम कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीच्या कामगिरीवर झाला.
बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले की, "राहुल गांधी यांची प्रतिमा मागील काही कालावधीत बदलली आहे. विशेष करून त्यांच्या भारत जोडो यात्रेनंतर त्यात कमालीचा बदल झालेला असला तरी देखील मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमं आणि भाजप यांनी जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा आणि ते कृतिशील गंभीर राजकारणी नसल्याचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.”
इंडिया आघाडी स्थापन होण्यामध्ये राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी केलेली भारत जोडो यात्रा आणि मणिपूर ते मुंबई केलेली भारत न्याय यात्रा याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती असंही मत त्यांनी मांडलं.
“इंडिया आघाडी स्थापन होण्यास एक राष्ट्रव्यापी कॅनव्हास मिळाला होता. त्या यात्रेतून जे वातावरण तयार झालं त्या आधारावर इंडिया आघाडी तयार झाली किंवा त्या यात्रेची इंडिया आघाडी स्थापन होण्यास मदत झाली. प्रसारमाध्यमांनी या यात्रेकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. मात्र राहुल गांधी लोकांमध्ये गेल्यामुळे लोकांवर त्यांचा प्रभाव पडला. या यात्रांचं आयोजन कॉंग्रेस पक्षानं केलं होतं त्यापेक्षा इतर स्वयंसेवी संस्था, गट यांनी स्वतंत्रपणे त्याला अधिक हातभार लावला होता," केतकर यांनी सांगितलं.
2. देशात इंडिया आघाडी, राज्यात महाविकास आघाडी
इंडिया आघाडीनं देशात आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात एकदिलानं काम केलं. जागावाटप करताना आणि निवडणूक लढवताना एकजूट कायम राखत निवडणुकीतील मुख्य मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. ही बाब महायुतीच्या अडचणीची ठरली.
इंडिया आघाडी स्थापन करण्यात राहुल गांधी आणि पक्ष म्हणून काँग्रेसने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काँग्रेसने सर्व पक्षांची मोट बांधत एक सक्षम पर्याय उभा केल्याचं केतकर यांना वाटतं.
ते सांगतात, "कॉंग्रेस पुढाकार घेत नाही, ते उद्धट आहेत, त्यामुळेच विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत हा आरोप केला जात होता. मात्र इंडिया आघाडी तयार होण्यात कॉंग्रेसची मोठी भूमिका होती. त्यांनी निवडणुकीत जागा त्यातुलनेत जास्त जागा देखील लढवल्या नाहीत. मित्र पक्षांसाठी जागा सोडल्या. आपणच पंतप्रधानपदाचे दावेदार असू ही भूमिकाही काँग्रेसनं घेतली नाही. एक पाऊल मागे येत कॉंग्रेसनं इंडिया आघाडीला पुढे नेलं.”
"इंडिया आघाडी हे नावदेखील राहुल गांधी यांचीच कल्पना होती. इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये त्या त्या राज्यातील दिग्गज नेते होते. मात्र एकप्रकारे इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधीच करत असल्याचं वातावरण निर्माण झालं होतं. याचा फायदा कॉंग्रेसला देखील झाला," असं केतकर सांगतात.
3. संविधान बचाव मोहिमेचा दलित, आदिवासींमध्ये खोलवर परिणाम
राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील नेत्यांनी संविधान धोक्यात असल्याचा आणि भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यास संविधानाला धक्का लागण्याचा मुद्दा लावून धरला आणि तो तळागाळापर्यंत पोचवला. याचा परिणाम निवडणुकीवर झाला.
राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन आपण संविधानाच्या बचावासाठी या लढाईत उतरलो आहोत असं म्हटलं होतं. पुन्हा संविधानाची प्रत राहुल गांधी यांनी निवडणूक निकालानंतर दाखवली.
'संविधान बचाव मोहीम' ही काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या प्रचारांपैकी महत्त्वपूर्ण होती असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईंनी सांगितलं.
4. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई
काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात शेतकऱ्यांचे प्रश्नाबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगारी, सर्वच थरातील महागाई या बाबी सर्वसामान्य मतदारांपर्यत नेण्यात महाविकास आघाडीला यश आलं.
खासकरून विदर्भ आणि मराठवाड्यात या प्रश्नांची धग जाणवत असताना काँग्रेसने याबाबत भूमिका घेत जनतेचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवलं.
काँग्रेसनं आपल्या घोषणापत्रात म्हणजे 'न्यायपत्रा'त सर्वच थरांतील नागरिकांसाठी विविध योजना आणि फायद्यांची मांडणी केली होती. यात महिलांना आर्थिक मदत, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार इत्यादी बाबींबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली होती, असं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईंनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं.
5. मतांची टक्केवारी वाढली
या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात जवळपास 16.41 टक्के मिळाली होती तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात साधारण 23 टक्के मतं मिळाल्याचं आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसतं आहे. साहजिकच काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली आहे.
सर्वच स्तरातील लोकांनी मतदान करावे यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी आवाहन केले होते. तरुण, महिला आणि सर्वच गटातील लोकांनी काँग्रेसच्या यात्रेत सहभाग घेतला होता. याचा फायदा काँग्रेसची मतदारांची टक्केवारी वाढण्यास झाला असं देसाई सांगतात.
Published By- Priya Dixit