विकास जयराम पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' याला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. त्याच्यासोबत इकरार खान वखार या 25 वर्षीय तरुणालाही अटक केलीय.
ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, यासाठी महाराष्ट्रातल्या विविध शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी काल (31 जानेवारी) आंदोलन केलं. हे आंदोलन 'हिंदुस्थानी भाऊ'च्या आवाहानानंतर केल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं.
त्यानंतर 'हिंदुस्थानी भाऊ'वर सर्वच स्तरातून टीका सुरू झाली. आज (1 फेब्रुवारी) मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, जमावबंदी आदेश, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम यांसह विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर विकास जयराम पाठक (हिंदुस्थानी भाऊ) आणि इकरार खान वखार खान या दोघांना अटक करण्या आली.
'हिंदुस्थानी भाऊ' मुळे मुंबईसह नागपूर, औरंगाबादमध्ये आंदोलन
काल (31 जानेवारी) मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे याठिकाणी बोर्डाची ऑफलाईन परीक्षा रद्द करावी यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
मुंबईत धारावीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर नागपूरमध्ये बसची तोडफोड केल्याचंही समोर आलं. 'हिंदुस्थानी भाऊ'च्या आवाहनानंतर ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलनात उतरलो, असं मुंबईत जमलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितलं.
तसंच 'हिंदुस्थानी भाऊ'चाही यासंदर्भातील एक व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 'हिंदुस्थानी भाऊ' नेमका कोण आहे?
या प्रकरणाचा तपास केला जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितलं. मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू असताना 500 ते 600 जणांची गर्दी झाली होती, असंही ते म्हणाले.
'हिंदुस्थानी भाऊ'ने विद्यार्थ्यांना नेमकं काय आवाहन केलं?
विकास पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आंदोलनासंदर्भातील अनेक व्हीडिओ पोस्ट करण्यात आले आहेत.
"31 जानेवारी दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांना आपली ताकद दाखवायची आहे. माझ्यासोबत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मर्जीने यावं. आपल्या हक्कासाठी यावं. पोलिसांना सहकार्य करायचं आहे. ते आपली ड्यूटी करत आहेत. आमचा मुद्दा हा आहे की परीक्षा रद्द झाल्या पाहिजेत. तुम्ही नंतर परीक्षा घ्या. मास्क घाला," असं आवाहन व्हीडिओमध्ये करण्यात आलंय.
आम्ही कोणालाही दुखवण्यासाठी आंदोलन करत नाही आहोत, असंही त्याने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
आंदोलनादरम्यान काढलेल्या एका व्हीडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या गर्दीकडे पाहून तो म्हणतो, "ही ताकद आहे विद्यार्थ्यांची. मी आता वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदन देत आहे. लवकरात लवकर परीक्षा रद्द करण्यात याव्या आणि मुलांची फी माफ करण्यात यावी."
आंदोलन आणि निवेदन दिल्यानंतरही मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुन्हा अशाच ताकदीने रस्त्यावर उतरणार असा इशाराही त्याने दिला.
"हे विद्यार्थी आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे." असंही त्याने आपल्या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
'हिंदुस्थानी भाऊ' कोण आहे?
राज्य शिक्षण मंडळाच्या म्हणजेच SSC,HSC बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या या मागणीसाठी आज (31 जानेवारी) मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
आंदोलनासाठी मुंबईत धारावी येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमली. रस्त्यावर शेकडो विद्यार्थी एकत्र आले आणि ऑफलाईन परीक्षा रद्द करा अशी मागणी त्यांनी केली.
इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही 'हिंदुस्थानी भाऊ' या नावाने प्रोफाईल असलेल्या पेजवर त्याचे व्हीडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. या व्हीडिओत विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, परीक्षा रद्द करा अशी मागणी 'हिंदुस्थानी भाऊ'ने केली आहे.
सोशल मीडियावर लोकप्रिय
'हिंदुस्थानी भाऊ' सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं दिसून येतं. विकास पाठक असं त्याचं खरं नाव आहे परंतु टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्रामवर 'हिंदुस्थानी भाऊ' या नावाने तो प्रसिद्ध आहे.
इन्स्टाग्रामवर त्याचे 1.4 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर फेसबुकवर 'हिंदुस्थानी भाऊ' या पेजवर 1.1 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.
पहले फुर्सत मे निकल' या वाक्याचे त्याचे मीम्स सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच त्याच्या 'देशभक्ती'पर काही व्हीडिओला प्रसिद्धी मिळाली होती.
बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्येही विकास पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
वादग्रस्त पार्श्वभूमी
गेल्या वर्षी जुलै महिन्यात 'हिंदुस्थानी भाऊ'ने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. हा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आपल्या व्हीडिओमध्ये तो म्हणाला, "जय हिंद! मी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेबांनंतर कोणता नेता आहे जो कुणाला घाबरत नाही तर ते राज ठाकरे आहेत. आपल्याला अशी माणसं आवडतात."
गेल्यावर्षीही बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी 'हिंदुस्थानी भाऊ'ने आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती.
8 मे 2021 मध्ये याला मुंबई पोलिसांनी कोरोनाचे नियम तोडल्यामुळे ताब्यात घेतलं होतं. कोरोना काळात दादर येथे शिवाजी पार्क याठिकाणी आंदोलन करत असल्याने त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती.
यापूर्वीही विकास पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' अनेक वादात अडकला होता. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि भडकाऊ विधानं केल्यामुळे त्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही ससपेंड करण्यात आलं होतं.
निर्माती एकता कपूर यांच्या एका वेब सिरीजसंदर्भातही विकास पाठकने तक्रार दाखल केली होती. तसंच अभिनेता संजय दत्त यांना कँसर झाल्याचं समोर आल्यानंतर त्यासंदर्भातही त्याने वादग्रस्त विधान केलं होतं.
विकास फाटक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' याने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं, "मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तीन महिन्यांपासून ही मुलं ट्वीटरवर 'कँसल बोर्ड एक्झाम' हा ट्रेंड चालवत होती. पण कोणत्याही मंत्र्यांनी त्यांची दखल घेतली नाही. मला काही मुलांनी मेसेज केले की तुम्ही आमची दखल घ्या. ही मुलं डिप्रेशनमध्ये गेली आहेत. म्हणून मी त्यांची मदत केली."
तो पुढे म्हणाला, "त्यांचा आवाज मंत्र्यांपर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं. विद्यार्थ्यांनी बसेस फोडल्या याचे पुरावे आहेत का? मी सामान्य माणूस आहे. मी मंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो असतो तर साधं गेटवरही मला ते भेटले नसते."
आमच्याशी चर्चा करावी - वर्षा गायकवाड
बीबीसी मराठीशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "आम्ही तज्ज्ञांशी चर्चा करूनच ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी आधी आमच्याशी चर्चा करावी. अशा पद्धतीची कृती यावर उपाय असू शकत नाही."
"बोर्डाच्या परीक्षा कशा पद्धतीने होतील यासंदर्भातील SOP लवकरच आम्ही देऊ. पण परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार आम्ही करत नाहीय. गेली दोन वर्षं परीक्षा रद्द झाल्या. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.
'हिंदुस्थानी भाऊ' यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं आहे. मी त्यांनाही हेच म्हटलं की तुम्ही भेटायला हवं होतं. तुमचं म्हणणं काय आहे हे आम्ही समजून घेतलं असतं."