Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे-नाशिक महामार्गावर प्रचंड खड्डे; संतप्त खासदार अमोल कोल्हे यांनी दिला हा इशारा

webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (07:49 IST)
पुणे – पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. पुण्याकडे निघाल्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याने ते वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती येत्या दहा दिवसांत पूर्ण न केल्यास त्या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाइल क्रमांकाचे फलक लावले जातील, असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत दिला.
 
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर ते आळे फाटा (पुणे जिल्हा हद्द) दरम्यान पर्यायी रस्त्याची कामे आणि सुरक्षा विषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड, दिलीप शिंदे आणि सर्व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते
या महामार्गावर प्रचंड वर्दळ, तसेच पुढे जाण्याची जीवघेणी चढाओढ असते. वाहतूक पोलिसांनाही वाहनचालक जुमानत नाहीत. या रस्त्यवर इतके मोठे खड्डे पडलेले आहेत, की चारचाकी मोठी वाहनेही थांबूनच पुढे जाऊ शकतात. अनेक मंदिरासमोरील खड्डा अद्यापही बुजविलेला नाही. काही मोठ्या खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती सोय केलेली आहे.
 
कोल्हे यांनी या बैठकीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि त्यामुळे धोकादायक झालेल्या वाहतुकीचा मुद्दा प्रामुख्याने मांडला. रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवरच देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे खड्डे पडल्यावर नागरिकांच्या तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून जबाबदारीने पुढील दहा दिवसांत दुरुस्तीची कामे पूर्ण करा. अन्यथा, या खड्ड्यांत कंत्राटदार-अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाइल क्रमांक टाकून फलक लावण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.
 
कोल्हे म्हणाले की, देखभाल दुरुस्तीसह कामांचे पैसे घेता, तर मग काम जबाबदारीने करायला हवे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नियमितपणे या रस्त्यावरून प्रवास करतात, त्यांना रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असे सवाल करीत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी द्रुतगती मार्गाच्या धर्तीवर संबंधित कंत्राटदाराने गस्तीची यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी सूचना कोल्हे यांनी केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्याही महामार्गांवर खड्डे दाखवा, अशी मोहीम हाती घेतली होती. महामार्गावर खड्डे दाखविल्यास तातडीने बुजविले जातील असेही आदेश त्यांनी दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो’ – संजय राऊत