Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘असनी’चक्रीवादळ बनले कमकुवत; महाराष्ट्राच्या हवामानावर होणार हा मोठा परिणाम

‘असनी’चक्रीवादळ बनले कमकुवत; महाराष्ट्राच्या हवामानावर होणार हा मोठा परिणाम
, गुरूवार, 12 मे 2022 (21:25 IST)
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘असानी’चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, आंध्र प्रदेश आणि किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात येत्या पाच दिवसांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार असून, उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असून, कमाल तापमानात विशेष वाढ होण्याची शक्यता नाही. दोन दिवसांत पूर्व भारतात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. परंतु त्यानंतर २ ते ४ अंशांनी तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशात १५ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण हरियाणा, दिल्ली, दक्षिण पंजाबमध्ये १२ मे ते १५ मे पर्यंत उष्ण वारे कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये जवळपास सर्व भागात कमाल तापमान ४५-४६ अंश आणि पूर्व राजस्थानाच्या काही भागात कमाल तापमान ४४-४५ अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे. राजस्थानात येत्या दोन दिवसात कमाल तापमान एक ते २ अंशानी वाढण्याच्या शक्यतेमुळे राजस्थानच्या सर्वच जिल्ह्यामध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.
 
बंगालच्या उपसागरात आलेले ‘असानी’ चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्री आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टनम आणि नरसापूरमदरम्यान कमकुवत झाले असून, आता कमी दाबाच्या क्षेत्रात त्याचे रूपांतर झाले आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) दिली आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच महारा विविध राज्यांमध्ये पुढील पाच दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
 
एसडीएमएचे संचालक बी. आर. आंबेडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘असानी’ ची तीव्रता कमी होऊन ते यानम-काकिनाडा क्षेत्रातील बंगालच्या उपसागरात विलीन होणार आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच ५०-६० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहणार आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि बंगालच्या उपसागरात हवामान प्रतिकूल असल्यामुळे मच्छिमारांनीही समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरातून बाहेर काढलेल्यांवर मी बोलत नाही; अकबरुद्दीन यांची राज ठाकरेंवर टीका