Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकरी चिडला तर सत्तेची आसने जळून खाक होतील

शेतकरी चिडला तर सत्तेची आसने जळून खाक होतील
शिर्डी , सोमवार, 24 जून 2019 (11:15 IST)
आगामी मुख्यमंत्री आमचाच असेल, असा दावा करणार्‍या भाजपला शिवसेनेने चांगलेच सुनावले. मुख्यमंत्री कोणाचा होणार हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. पण शेतकरी चिडले तर सत्तेची आसने जळून खाक होतील, अशा शब्दात त्यांनी सुनावले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांची मते आपल्या बाजूने खेचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
 
शेतकर्‍याशी निगडित असणारे पीकविमा केंद्र श्रीरामपूर येथे शिवसेनेच्यावतीने उघडण्यात आले असून त्याचे उद्‌घाटन रविवारी उद्धव यांनी केले. यावेळी सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील शिंदे, संजय घाडी, संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे, भाऊ कोरेगावकर, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, डॉ. हेश क्षीरसागर, विजय काळे, सभापती दीपक पटारे, सेनेतर्फे श्रीरामपूरमधून निवडणूक लढवू पाहणारे खासदार लोखंडे यांचे चिरंजीव डॉ.चेतन लोखंडे , सचिन बडधे, राजेंद्र देवकर, निखिल पवार, दादासाहेब कोकणे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब चिडे, संकेत संचेती हे उपस्थित होते. नाशिकहून खास विमानाने उद्धव यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. तेथून ते मोटारीने तडक साई मंदिरात दर्शनास गेले. दर्शन आटोपून ते श्रीरामपूरच्या सभेला रवाना झाले. त्यांच्या समवेत मंत्री एकनाथ शिंदे होते.
 
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री होईल असा दावा करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्री यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव यांनी चांगलेच सुनावले.  
 
उद्धव म्हणाले, कर्जमाफी व पीक विम्याचा लाभ किती शेतकर्‍यांना मिळाला? शेतकर्‍यांनी हात उंचावून सांगावे असे आवाहन करताच शेतकर्‍यांनी नाही असे उत्तर ठासून सांगितले. त्यावर उद्धव म्हणाले. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पीकविमा केंद्र सुरू करा. शिवसेना पदाधिकार्‍यांनी घरोघरी जाऊन शेतकर्‍यांना याची माहिती द्या, असे ठाकरे म्हणाले. शिवसेनेची शेतकर्‍यांच्या प्रश्नावर नेहमीच लढण्याची भूमिका राहिली. पुणतांबे येथील शेतकर्‍यांनी संपावेळी भेट घेतली असता मी विनाअट पाठिंबा दिला. इतर पक्षातील नेते आंदोलनापासून सावध भूमिका बाळगून होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अन्नदाता सुखी राहिला पाहिजे. त्याचा बळी देण्याचे पाप आपण कदापि करणार नाही. शिवसेनेची ताकद ही तुम्ही आहात. तुमच्या हक्काच्या आड कोण येतो ते पाहतो, असा सज्जड इशाराही उद्धव यांनी सत्ताधारी भाजपला दिला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार लोखंडे यांना सलग दुसर्‍यांदा विजयी केल्याने मी येथील मतदारांचा ऋणी आहे. सेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांनी जनतेच्या दारापर्यंत जा आणि ज्यांनी सत्ता मिळवून दिली त्यांचे अश्रू पुसायला तत्पर राहा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेने सत्तेत राहूनही कधीही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर तडजोड केली नाही. शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी याला आमची प्राथमिकता होती. पक्षप्रुख उद्धव, आदित्य ठाकरे यांनी त्याकरिता संपूर्ण राज्याचा झंझावती दौरा केला. यापुढेही आपला संघर्ष सुरूच राहील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बलात्काराच्या आरोपीला IPSने गोळ्या घातल्या