नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेलं आहे. सततच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलं आहे.
राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बर्याच अंशी सुधारली आहे, तिथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.
कोरोनाविरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये. आर्थिक विवंचनेमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे, कल्याणमध्ये व्यापार्याने आत्महत्या केली, नालासोपार्यात एका युवकाने जीवन संपविले, चंद्रपुरात एका भोजनालय चालकाने आत्महत्या केली. नागपुरातील कोरोनाच्या गेल्या 10 दिवसांतील स्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. 17 ते 27 जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत नागपुरात एकूण झालेल्या चाचण्या 59,948 इतक्या आहेत, तर त्यात कोरोना संसर्ग आढळून आलेले रूग्ण 58 इतके आहेत. हे प्रमाण 0.10 टक्के इतके आहे. त्यामुळे आता नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे, अस फडणवीस यांनी म्हटलं आहे.